Harbhara Lagwad Information in Marathi | हरभरा हे महाराष्ट्रातील मुख्य कडधान्य पीक pulse crop असून या पिकाला मध्यम ते भारी तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी सुपीक जमीन निवडावी. चोपण व आम्लयुक्त जमिनीत हे पीक घेण्याचे टाळावे. कोरडवाहू परिस्थीतीमध्ये जमिनीची कमीत कमी मशागत करावी जेणेकरून जमिनीतील ओल टिकवून राहण्यास मदत होईल. हरभरा लागवड तंत्राविषय़ी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.
पेरणीचा कालावधी व पद्धत – Chana Sowing Type
– जिरायती हरभऱ्याची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी. जिरायती परिस्थितीत देशी हरभरा झाडांची हेक्टरी संख्या राखण्याकरिता बियाणे चार तास पाण्यात भिजवून व नंतर सावलीत वाळवून बीजप्रक्रिया करूनच पेरावे.
– ओलिताखाली हरभरा ऑक्टोबरच्या दुसरा पंधरवड्यात पेरल्यास अधिक उत्पादन मिळते.
– काबुली हरभऱ्याची उशिरा पेरणी १० नोव्हेंबरच्या आसपास करावी.
– कोरडवाहू परिस्थीतीमध्ये दोन ओळीतील अंतर ३० सें.मी., तर दोन झाडातील अंतर १० सें.मी. ठेवावे. बागायती परिस्थीतीमध्ये व काबुली वाणाकरिता दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. व दोन झाडातील अंतर १० सें.मी. ठेवावे. ओलिताखालील हरभऱ्याच्या पेरणीसाठी रुंद वाफा पद्धत वापरणे फायद्याचे ठरते.
बियाण्याचे प्रमाण – Types of Chana Variety
– लहान आकाराच्या दाण्यांच्या वाणाकरिता हेक्टरी ५०-६० किलो बियाणे वापरावे.
– मध्यम आकाराच्या दाण्यांच्या वाणाकरिता हेक्टरी ७५-८० किलो बियाणे वापरावे.
– मोठ्या आकाराच्या दाण्यांच्या वाणाकरिता यामध्ये काबुली वाणांमध्ये विराट, बीडीएनजीके-७९८, पीकेव्ही काबुली-२ व पीकेव्ही काबुली-४ या वाणांचे १०० ते १२५ किलो प्रतिहेक्टर या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे.
सुधारित वाणाची निवड – Selection of Improved Variety
१. देशी हरभरा
हा हरभरा मुख्यत्वे डाळीकरिता व बेसनाकरिता वापरतात. दाण्याच्या आकार मध्यम असतो. देशी हरभऱ्याच्या आकाश, विजय, बीडीएनजी ९-३, जाकी ९२१८, फुले विक्रम, विशाल, दिग्विजय या वाणांची निवड करावी.
२. काबुली हरभरा
हा हरभरा छोले भटुरे बनविण्यासाठी वापरतात. काबुली हरभऱ्याच्या बीडीएनजीके- ७९८, पीकेव्ही काबुली-२, पीकेव्ही काबुली-४, विराट या वाणांची निवड करावी.
३. हिरवा हरभरा
या वाणाच्या दाण्याचा रंग वाळल्यानंतर सुद्धा हिरवा राहतो. लागवडीसाठी हिरवा चाफा या वाणाची निवड करावी.
बीजप्रक्रिया आवश्यक
मर, मूळकुज किंवा मानकुज रोगांपासून बचाव करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति कीलो बियाण्याला ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाची किंवा २.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम ची बिजप्रक्रिया करावी.
द्रवरूप रायझोबियम १०० मिली + १०० मिली द्रवरूप पी.एस.बी. प्रति १० किलो बियाणे या प्रमाणात जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी.
खत व्यवस्थापन
कोरडवाहू हरभऱ्यासाठी १०० किलो डी.ए.पी. वापरावे किंवा ४४ किलो युरिया + २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट वापरावे.
बागायती हरभऱ्यासाठी ५० किलो युरिया + ३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट + ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश वापरावे किंवा १२५ किलो डी.ए.पी. + ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश वापरावे.
गंधक किंवा जस्ताची कमतरता असणाऱ्या जमिनीत नत्र व स्फुरदासोबत २० किलो गंधक किंवा २५ किलो झिंक सल्फेट प्रतिहेक्टरी पेरणीपूर्वी जमिनीत पेरून द्यावे. फुलोरा अवस्थेनंतर नत्र स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते त्यामुळे पीक फुलोऱ्यात असताना २ टक्के युरियाची पहिली फवारणी व त्यानंतर १० दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
आंतरमशागत –
पीक ४० ते ४५ दिवसांचे होइपर्यंत दोन कोळपण्या कराव्यात व एक निंदणी आवश्यकतेनुसार देऊन पीक तण विरहित ठेवावे.
पाणी व्यवस्थापन – Water Management
हरभरा पिकास पाणी शक्यतो तुषार सिंचनाने द्यावे. उगवणीनंतर पहिले पाणी पीक कळीवर असताना म्हणजेच पीक ४० ते ४५ दिवसांचे झाल्यानंतर, दुसरे पाणी घाटे भरतेवेळी म्हणजेच पीक ४० ते ४५ दिवसांचे झाल्यानंतर द्यावे. मर्यादित पाणी उपलब्ध असल्यास कमीत कमी एक पाणी घाटे भरतेवेळी द्यावे.
– दोन ओळी रुंद वरंबा सरी पद्धतीने ओलीत केल्यास इतर पद्धतीच्या मानाने ३० टक्के पाण्याची बचत होते. तसेच उत्पादनात २० टक्के वाढ मिळते. मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले, कळी असताना दुसरे व घाटे भरतेवळी तिसरे पाणी द्यावे. अधिक प्रमाणात पाणी दिल्यास पीक उधळण्याचा धोका असतो. जमिनीचा प्रकार आणि खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यामध्ये अंतर ठेवावे. मात्र पाणी देण्यास उशीर करून जमिनीस भेगा पडू देऊ नयेत. तसेच पाणी साचू देऊ नये. अन्यथा मुळकुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते.
काढणी – Harvesting
हरभरा पीक परिपक्व झाल्यानंतर पाने पिवळी पडतात, घाटे वाळू लागतात. त्यानंतर पिकाची कापणी करावी. अन्यथा पीक जास्त वाळल्यावर घाटेगळ होऊन नुकसान होते. त्यानंतर खळ्यावर एक दोन दिवस काढलेला हरभरा वाळवून मळणी करावी.