MahaBhulekh 7 12 Utara : बोगस सातबारा उतारा कसा ओळखाल ? जाणून घ्या ३ सोप्या पद्धती - Loksutra

MahaBhulekh 7 12 Utara : बोगस सातबारा उतारा कसा ओळखाल ? जाणून घ्या ३ सोप्या पद्धती

MahaBhulekh 7 12 Utara :- बनावट किंवा बोगस सातबारा वापरून कर्ज उचल्ल्याचे किंवा जमिनीचा व्यवहार केल्याची प्रकरणं अनेकदा समोर येतात.

बोगस सातबारा वापरून कर्ज घेतलं आणि नंतर संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्याची प्रकरणंही महाराष्ट्रात घडली आहेत.

2 महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात अशीच घटना समोर आली.

श्रीगोंदे तालुक्यातील पिसोरे बुद्रुक गावातील 7 जणांनी संगनमतानं शेतीचे बनावट सातबारा उतारे, फेरफार आणि खोटे दस्त तयार करून आयडीबीआय बँकेकडून 25 लाख 61 हजार रुपयांचं कर्ज घेत बँकेची फसवणूक केली.

याप्रकरणाशी संबंधित 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

याशिवाय जमिनीचा व्यवहार करतानाही बोगस सातबारा उतारा दाखवून फसवणूक केली जाते.

त्यामुळे मग सातबारा उताऱ्याच्या आधारावर व्यवहार करताना तो उतारा खरा आहे की खोटा हे तपासणं गरजेचं ठरतं.

आता ते कसं तपासायचं त्याचे 3 सोपे उपाय आपण जाणून घेणार आहोत.

1. तलाठ्याची सही
सातबारा उताऱ्यावर तलाठ्याची सही असते. जर तुम्ही करत असलेल्याल्या व्यवहारात जो सातबारा उतारा तुमच्याकडे सादर केला जातो, त्यावर तलाठ्याची सही नसेल तर तो सातबारा बोगस असतो.

सरकारनं गेल्या काही वर्षांपासून डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.

या सातबारा उताऱ्यावर खालच्या भागात स्पष्टपणे सूचना दिलेली असते की, “या सातबारा उताऱ्यावरील गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12 डिजटल स्वाक्षरीत तयार केला असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्क्याची गरज नाही.”

तुमच्यासमोर सादर केलेल्या डिजिटल सातबाराऱ्याच्या प्रिंटआऊटवर अशी सूचना नसेल तर तो बोगस सातबारा असतो.

2. क्यूआर कोड
सातबारा उताऱ्यातील नवीन बदलांनुसार, सातबारा उताऱ्यावर क्यूआर कोड दिलेला असतो. तुमच्याकडे आलेल्या सातबारा उताऱ्यावर तो नसेल, तर तो सातबारा बोगस असतो.

जमिनीच्या व्यवहारादरम्यान किंवा शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी एखादी व्यक्ती सातबारा उताऱ्याची प्रिंट आऊट घेऊन आल्यास त्यावरील क्यूआर कोड स्कॅन करता येतो.

तो स्कॅन केला की ओरिजिनल सातबारा उतारा दिसतो. यावरून संबंधित व्यक्ती घेऊन आलेला सातबारा उतारा खरा आहे की खोटा हे पडताळून पाहता येतं.

3. LGD कोड आणि ई-महाभूमी प्रकल्पाचा लोगो
सातबारा उताऱ्यावरील नवीन बदलांनुसार, सातबारा उताऱ्यावर आता शेतजमिनीच्या माहितीसोबतच गावाचा यूनिक कोड क्रमांक नमूद केलेला असतो.

सातबारा उताऱ्यावर गावाच्या नावासमोर हा कोड कंसात नमूद केलेला असतो. याला सरकारी भाषेत Local Government Directory (LGD) असं म्हणतात.

तुमच्याकडे आलेल्या सातबारा उताऱ्यावर हा कोड नमूद केलेला नसेल, तर तो सातबारा उतारा बोगस असतो.

याशिवाय, 3 मार्च 2020 ला महाराष्ट्र सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यावर वरच्या बाजूला महाराष्ट्र शासनाचा आणि ई-महाभूमी प्रकल्पाचा लोगो टाकण्यास मान्यता दिली.

प्रत्येक डिजिटल सातबारा उताऱ्यावर हे दोन्ही लोगो दिसून येतात. पण, जर तुमच्याकडील डिजिटल सातबारा उताऱ्याच्या प्रिंट आऊटवर हे दोन्ही लोगो नसतील तर तो सातबारा बोगस आहे असं समजावं.

‘अपडेटेड सातबारा उतारा काढा’
जमिनीसंबंधीचा कोणताही व्यवहार करताना फसवणूक होऊ नये, यासाठी अपडेटेड साबतारा उताराच वापरावा, असं मत जाणकार व्यक्त करतात.

महसूल कायदेतज्ञ डॉ. संजय कुंडेटकर यांच्या मते, “आता संगणकीकृत सातबारा उपलब्ध झाल्यामुळे बोगस सातबारा उताऱ्याच्या तक्रारी जवळजवळ संपुष्टात आल्या आहेत. बनावट सातबारा उतारा वापरून जमिनीची खरेदी केल्याची प्रकरणं आता फार कमी झालीये. पूर्वी हस्तलिखित सातबारे असायचे, त्यामुळे मग त्यात बदल केले जायचे. आता मात्र तसं होत नाही.”

जमिनीचा व्यवहार करताना संबंधितांनी सरकारच्या महाभूमी वेबसाईटवर जाऊन अपडेटेड सातबारा उतारा काढल्यास फसवणूक टाळण्यास मदत होईल, असंही ते पुढे सांगतात.

हे पण वाचा –

Leave a Comment