कृषी ग्रुप जॉईन करा

Ferilizers in Marathi | सेंद्रिय व रासायनिक खतांचे प्रकार व त्यांचा वापर कुठे आणि कसा करावा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो, लोकसुत्र मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सेंद्रिय व रासायनिक खताबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. दोन्ही प्रकारच्या खतांचे महत्व हे आपल्या शेतीत कशाप्रकारे आहे, तसेच शेतकऱ्यांच्या फायद्याचं नेमकं खत कोणतं? आणि कोणत्या खतामध्ये कोणते घटक असतात? आणि ते किती प्रमाणात असतात, या आणि अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा लेख वाचत राहा.

वनस्पतींना आवश्यक असणारी अन्नद्रव्ये

अ) मुख्य अन्न्द्रव्ये (अधिक प्रमाणात लागणारी) कर्ब (C), प्राणवायू (O) आणि हायड्रोजन (H) ही हवा आणि पाण्यातून मिळतात व नत्र (N), स्फुरद (P) आणि पालाश (K) ही जमिनीतून मिळतात.

ब) दुय्यम अन्नद्रव्ये (मध्यम प्रमाणात लागणारी) चुना, मॅग्नेशियम आणि गंधक जमिनीतून मिळतात.

क) सूक्ष्म अन्न्द्रव्ये (कमी प्रमाणात लागणारी) जस्त, लोह, मँगनीज, तांबे, मॉलीब्डेनेम, बोरॉन, क्लोरीन आणि सोडीयम जमिनीतून मिळतात.

खतांचे प्रकार कोणते? । What Are the Types of Fertilizers in Marathi

(अ) सेंद्रिय खते

(ब) रासायनिक खते

(सेंद्रिय खते : वनस्पती, प्राणी आणि जीवजंतू यांच्या अवशेषापासून मिळणाऱ्या खतास सेंद्रिय खत असते म्हणतात. या खतांमध्ये अन्नद्रव्याचे प्रमाण रासायनिक खतापेक्षा कमी असते, म्हणून यांची मात्रा फारच अधिक वापरावी लागते. ही खते पिकांना सावकाश लागू पडतात आणि जमिनीच्या भौतिक गुणधर्मावर अनुकूल परिणाम होऊन जमिनीचा पोत सुधारतो तसेच जलधारणा शक्ती वाढते. त्याचप्रमाणे जमिनीच्या जैविक गुणधर्मात सुधारणा होते.

सेंद्रीय खतांचे प्रकार । Types of Organic Fertilizers in Marathi

१) भरखते : शेणखत, कंपोस्ट, लेंडीखत

२) जोरखते : सर्व प्रकारच्या पेंडी, मासळी खत, शिंग आणि खुरांचे खत इत्यादी.

हिरवळीची खते : यात मुख्यत: झाडांचा पाला, फांद्या आणि वनस्पतीचे अवशेष जमिनीमध्ये गाडले जातात. बोरु, धैंचा, उडीद, मूग, चवळी, गवार इत्यादी द्विदल पिके शेतात वाढवून फुलोऱ्याच्या वेळी नांगरुन जमिनीत गाडली जातात. याशिवाय गिरीपुष्प, सुबाभूळ इत्यादीच्या कोवळ्या फांद्या, पाने जमिनीत गाडून कुजविली जातात. करंज, गाजर फुली सारख्या या हिरवळीच्या खतामुळे जमिनीस सेंद्रीय पदार्थ पुरविले जातात. जमिनीची जलधारणाशक्ती वाढते. शिवाय पीकपोषक अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.

गिरीपुष्प – उत्तम हिरवळीचे खत गिरीपुष्प हे हिरवळीच्या खताचे अतिशय उपयुक्त पिक असून या पिकाची लागवड शेतीच्या बांधावर कलमाद्वारे करावी, किंवा बिया टाकून करावी. गिरीपुष्पाच्या कोवळ्या फांद्या व पाला पावसाळ्यामध्येय शेतात टाकल्यास कुजून त्यापासून मुख्यत: नत्र व सेंद्र‍िय पदार्थांचा पुरवठा होतो. गिरीपुष्पातून मिळणाऱ्या मुख्य अन्नद्रव्याचे प्रमाण खालीलप्रमाणे आहे.

नत्र (N) ०.६ ते ०.७%, स्फुरद (PO) ०.१ ते ०.२%, पालाश (KO) ०.५ ते ०.६%

तक्ता क्र. १ : निरनिराळ्या सेंद्रिय खतातील (साधारणपणेअन्नद्रव्याचे प्रमाण

अ.क्र.सेंद्रिय खताचे नांवनत्र %स्फुरद %पालाश %
.शेणखत०.८४०.६११.५६
.लेंडीखत०.५०.५–०.८१.००
.कोंबडीचे खत०.५२.५१.००
.डुकराचे खत०.५५०.५००.४०
.कंपोस्ट खत (सर्वसाधारण)
ग्रामीण०.४-०.८०.३–०.६०.७–१.००
शहरी१.२-२.०१.००१.००
.गांडूळ खत०.५-१.०६०.३-२.३००.१५–०.५०
.पेंडी खत, भुईमुगाची पेंड७.१६१.२२०.९४
.करडईची पेंड५.०११.६३०.६३
.एरंडीची पेंड४.५५१.७२०.७०
१०.सरकीची पेंड (प्रक्रिया केलेली)७.००३.००२.००
११.करंज पेंड४.००१.००१.००
१२.निम पेंड५.००१.००१.५०
१३.मोहाची पेंड२.५००.८०१.८०
१४.रक्तांचे खत११-२४०.८६०.५४
१५.मासळीचे खत५.१५(४ ते १०)५.२०(३ ते ४)१.६३–
१६.हाडाचे खत३.८८२१.५६
१७.ॲनिमल मील८.५०७.८०
१८.खुराचे व शिंगाचे खत१०-१५१–०
१९.उसाची मळी०.२५०.४–०.५
२०.हिरवळीची खते (सरासरी)०.५-०.७०.१–०.२०.८–१०.६

कंपोस्ट खते व ते तयार करण्याच्या विविध पध्‍दती । Types of Compost Fertilizers and Methods of Preparation of Compost

विविध प्रकारच्या सेंद्रिय खतांमध्ये कंपोस्ट खताला अनन्यसाधारण असे स्थान आहे. कारण कंपोस्ट खत म्हणजे जिवाणूंच्या साह्याने शेतीमध्ये उपलब्ध असलेल्या टाकाऊ स्वरुपाचा काडीकचरा, पानगळ, जनावरांची उष्टावळ व मलमूत्र यापासून कुजवून तयार केलेले उत्कृष्ट खत होय.

वनस्पतीजन्य व प्राणिजन्य स्वरुपाच्या टाकाऊ पदार्थापासून निर्माण केलेले कंपोस्ट खत जमिनीची सुपिकता व उत्पादनक्षमता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचे साधन आहे. अशा प्रकारे सेंद्रिय खते वापरले असता त्यातील अन्नद्रव्ये पिकांना सतत व हळुवारपणे उपलब्ध होतातच पण त्याशिवाय जमिनीत ह्युमस सारख्या प्रभावी घटकांचे प्रमाण वाढून त्यातून वनस्पतीच्या वाढीस उपयुक्त अशी इतर अन्नद्रव्ये निर्माण होण्यास मदत होते. जमिनीचा पोत सुधारुन जलधारणा शक्तीत वाढ, हवा व पाणी यांचे योग्य संतुलन, तापमानाचे नियमन इत्यादी बाबींमुळे जमिनीच्या कायिक, रासायनिक व जैविक गुणधर्मावर अनुकुल परिणाम होऊन तिची एकंदर दुरगामी उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते.

कंपोस्ट खताची निर्मिती : कंपोस्ट खत तयार करण्याच्या विविध पद्धती प्रचलित असून त्यात तौलनिकदृष्ट्या अनेक गुणदोष अंतर्भूत आहेत.

(१) इंदौर पद्धत किंवा ढीग पध्‍दत : यामध्ये शेतीतील काडीकचरा, मलमुत्र, इतर सेंद्रिय पदार्थ एकत्र करुन एक आड एक थरात पसरुन साधारणत: सहा फूट रुंद आणि सेंद्रिय पदार्थाच्या उपलब्धतेनुसार लांबी ठेवून जमिनीवर ५ ते ६ फुट उंचीपर्यंत रचला जातो. अधूनमधून पाणी शिंपडून ओलावा टिकविला जातो. एक महिन्याच्या अंतराने मजुराच्या उपलब्धतेनुसार ढीग तीन ते चार वेळा  वरखाली करुन कुजणारे पदार्थ एकजीव केले जातात. कुजण्याची क्रिया उघड्यावर ऑक्सीजनयुक्त वातावरणात होत असल्याने लवकर होते परंतु यामध्ये ओलावा लवकर उडून जातो व काही प्रमाणात अन्नद्रव्ये वायु रुपात वाया जातात. ढिगावर प्लास्टिकचे आच्छादन टाकल्यास तापमानात वाढ होऊन कुजण्यास मदत होते. तसेच अन्नद्रव्याचा ऱ्हास पण थांबवता येतो. अशा प्रकारे तयार केलेल्या कंपोस्ट खतामध्ये सुमारे ०.८ ते १.५ टक्के नत्र, ०.५ ते १.० टक्के स्फुरद, ०.८ ते १.८ टक्के पालाश आणि इतर दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्येही उपलब्ध असतात.

(२) बंगलोर पद्धत किंवा खड्डा पध्‍दत : यामध्ये ६ फुट रुंद, ३ फुट खोल व सोयीनुसार लांबी असलेला खड्डा तयार केला जातो. खड्डयाचा तळ व बाजू चांगल्याप्रकारे ठोकून घेतल्या जातात. त्यानंतर प्रथम ६ इंच जाडीचा काडीकचरा व इतर सेंद्रिय पदार्थांचा थर देऊन पाणी शिंपडून ओला केला जातो. अशा क्रमाने खड्डा पूर्ण भरुन जमिनीच्या सुमारे दीड ते दोन फुट उंचीपर्यंत भरुन माती व शेणकाल्याचे मिश्रण करुन लिंपून घेतला जातो. खड्डयात ओलावा टिकविण्यासाठी अधूनमधून पाणी शिंपडले जाते.

कुजण्याची क्रिया सुरुवातीस ऑक्सिजनयुक्त वातावरणात व नंतर ऑक्सिजन विरहित वातावरणात होत असल्याने कुजण्याचा वेग मंदावतो त्यामुळे खत तयार होण्यास लागणारा कालावधी वाढतो, अर्थात ढीग पद्धतीच्या तुलनेत अन्नद्रव्याचे वाया जाण्याचे प्रमाण कमी असते.

कुजण्याचा वेग चांगला राखण्यासाठी व कंपोस्ट खताची गुणवत्ता वाढविण्यासाठी खालील बाबी महत्वाच्या आहेत.

१. सेंद्रिय पदार्थामधील दगड, विटांचे तुकडे, कचरा, खिळे, प्लॅस्टिकचे तुकडे इत्यादी पदार्थ वेचून बाजूला टाकावे.

२. सेंद्रिय पदार्थांचे शक्यतो लहान लहान तुकडे (१५ ते २० सें.मी.) करुन थर द्यावा, त्यावर शेणकाल्याचे मिश्रण टाकावे.

३. शेणखतामध्ये प्रति टन उपल्बध सेंद्रिय पदार्थास अर्धा किलो या प्रमाणात कंपोस्ट तयार करणारे जिवाणू खत मिसळावे.

४. जनावरांचे मूत्र‍ किंवा अर्धा किलो युरिया किंवा अमोनियम सल्फेट व दोन किलो सुपर फॉस्फेट पाण्यात एकजीव मिश्रण करुन प्रत्येक थरात शिंपडावे.

५. या बरोबर जुने कुजलेले शेणखत चांगले वाळवून थरात विरजन म्हणून टाकल्यास कंपोस्ट खत कुजण्यास मदत होते.

६. खड्डयात सतत ओलावा राहील याची दक्षता घ्यावी.

७. अशाप्रकारे खड्डा भरुन खड्डयातील थर एक महिन्याच्या अंतराने शक्य असल्यास खालीवर करुन एकत्रित केल्यास ४ ते ५ महिन्यात उत्कृष्ट कंपोस्ट खत तयार होते.

(३) नॅडेप पध्‍दत : या पध्‍दतीत जमिनीवर पक्क्या विटांच्या साह्याने १० फुट लांब, ६ फुट रुंद व ३ फुट उंच अशा आकाराच्या टाकीचे बांधकाम केले जाते. विटाच्या दोन थरानंतर तिसऱ्या थरात खिडक्या सोडल्या जातात. नंतर या टाक्यामध्ये सुमारे दीड टन काडीकचरा, १०० कि.ग्रँ. शेण व दीड टन चांगली चाळलेली जमिनीच्या वरच्या थरातील जिवाणुयुक्त माती भरली जाते.

      कंपोस्टची टाकी भरतानां प्रथम टाक्याचा तळ चांगला ठोकून शेणाचा सडा टाकून घ्यावा व त्यानंतर ६ इंच जाडीचा काडीकचरा व इतर सेंद्रिय पदार्थाचा थर द्यावा व त्यावर सुमारे १०० लिटर पाण्यात ४ ते ५ किलो ग्रॅम शेण मिसळून शिंपडले जाते.

यानंतर साधारणत: अर्धा इंच जाडीचा चाळलेला मातीचा थर देऊन परत पाणी शिंपडून ओला केला जातो. याचप्रमाणे पूर्ण टाकी भरली जाते व अधूनमधून पाणी टाकून टाकीत योग्य तो ओलावा (५० ते ६० टक्के) राखला जातो.

अशाप्रकारे टाकीमध्ये कुजण्याची प्रक्रिया सर्वच थरात ऑक्सिजनयुक्त वातावरणात जलद व सारख्याच प्रमाणात होते. त्याशिवाय कंपोस्ट तयार होत असतांना ओलावा तितक्या प्रमाणात उडत नाही आणि अन्नद्रव्याचा ऱ्हास पण होत नाही व ३ ते ४ महिन्यात उत्कृष्ट कुजलेले चांगले कंपोस्ट तयार होते.

कंपोस्ट खत तयार करतानां घ्यावयाची काळजी

1.  तयार केलेले कंपोस्ट खत चांगल्या प्रतीचे होण्यासाठी वापरण्यात येणारा काडीकचरा जनावरांच्या गोठ्यात ठेवला तर त्यात शेण व मूत्र मिसळले जावून खताची प्रत चांगली होते पण त्याशिवाय ते जलद कुजण्यास मदत होते.

2.  तूर, तीळ, कापसाच्या पराट्या, ज्वारीची धसकटे खड्डयात भरायची असतील तर ते भरण्यापूर्वी शक्य तितके लहान लहान तुकडे केले तर लवकर कुजतात.

3.  कार्बन व नत्राचे प्रमाण अधिक असणारे सेंद्रिय पदार्थ (लवकर कुजणारे ) उदा. गव्हाचे काड, भाताचे तणीस, भुईमुगाची टरपले इत्यादी पासून जर कंपोस्ट तयार करावयाचे असेल तर प्रत्येक थरात जनावरांच्या गोठ्यातील साठलेला मुत्राचा हलका शिडकावा करावा किंवा हे शक्य नसेल तर युरिया किंवा अमोनिया सल्फेटचे १.५ ते २.५ टक्के तीव्रतेचे द्रावण शिंपडावे जेणेकरुन त्यातील नत्राचे प्रमाण वाढून खत लवकर तयार होईल.

4.  कंपोस्ट लवकर कुजण्या करिता त्यात सतत ओलावा राहील याची काळजी घ्यावी.

(सुपर कंपोस्ट खत : रासायनिक खताच्या तुलनेत कंपोस्ट खतातील अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असल्यामुळे ती वापरण्यास शेतकरी सहसा धजत नाहीत म्हणून त्यातील अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढविण्याचे दृष्टिकोनातून विशेषत: स्फुरदाचे प्रमाण वाढविण्याकरिता प्रत्येक थरात १० ते १५ किलो सुपरफॉस्फेटचा थर देणे फायदेशीर आहे. यापासून तयार झालेल्या कंपोस्ट खतालाच सुपर कंपोस्ट खत असे म्हणतात. यामुळे कुजण्याची क्रिया तर लवकर होतेच पण त्याचबरोबर स्फुरद तसेच नत्राचे वाया जाण्याचे प्रमाण कमी होते. कंपोस्ट खताचा दर्जा सुधारतो.

(ऊसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत तयार करण्याचे तंत्रज्ञान : मराठवाड्यात ऊसाचे क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावर आहे. ऊस नेल्यानंतर शेतात भरपूर पाचट उपलब्ध होते आणि शेतकरी ते पाचट जाळून टाकतात. पाचट जाळल्यामुळे जमिनीच्या वरच्या थरातील उपयुक्त जिवाणूचा नाश होतो. तसेच पाचटामधील अन्नद्रव्यांचा देखील नाश होतो व ऊसाच्या मुळाला उष्णतेची झळ बसल्यामुळे त्याच्या फुटव्यावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे पाचट कुजून सेंद्रिय खत तयार करण्याचे तंत्र विद्यापीठाने विकसित केले आहे.

खोडवा ऊसामध्ये शेतातील पाचट खोडव्यातील सरीमध्ये समप्रमाणात पसरावे व त्यानंतर एकरी एक बॅग युरिया, एक बॅग सुपर फॉस्फेट, १० टन ऊसाची मळी व शेवटी चार किलो पाचट कुजविणारे जिवाणू पसरावे. त्यानंतर खोडव्याच्या बगला फोडून माती पाचटावर पसरावी. काही पाचटे उघडी राहिल्यास पाणी देतांना उघडे पडलेले पाचट दाबून टाकावे. त्यानंतर पिकास नेहमीच्या पद्धतीने पाणी व खते द्यावी. ३-४ महिन्यात संपूर्ण पाचट कुजून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत मिळते.

(रासयनिक खते : यामध्ये अन्नद्रव्याचे प्रमाण अधिक असून ते पिकांना लवकर उपलब्ध होते. ज्या रासायनिक खतामध्ये ठराविक प्रमाणात एकापेक्षा अधिक अन्नद्रव्ये संयुक्त अवस्थेत आणली जातात त्यांना संयुक्त खते म्हणतात. रासायनिक प्रक्रियेच्या माध्यमाचा वापर न करता एक वा अधिक अन्न्द्रव्ये मिसळून तयार केलेल्या खतांना मिश्रखते म्हणतात.

रासायनिक खताचे प्रकार । Types of Chemical Fertilizers in Marathi

  1. नत्रयुक्त खते :         युरिया, अमोनियम सल्फेट
  2. स्फुरदयुक्त खते :       सुपर फॉस्फेट, डायकॅल्शियम फॉस्फेट
  3. पालाशयुक्त खते :       म्युरेट ऑफ पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅश
  4. दुय्यम खते :           चुना, गंधक, मॅग्नेशियम
  5. सूक्ष्म अन्नद्रव्ये :             जस्त सल्फेट, मोरचूद, हिराकस, मँगनीज सल्फेट,

बोरॅक्स, अमोनियम मॉलिब्डेट

तक्ता क्र. ३ : रासायकनिक खतातील अन्नद्रव्यांचे प्रमाण (शेकडा)

अ.क्र.खताचे नांवनत्रस्फुरदपालाशगंधक
)नत्रयुक्त खते
१. अमोनियम सल्फेट२०.६०२४.००
२. अमोनियम क्लोराईड२५.००
३. अमोनियम सल्फेट नाईट्रेट२५.००
४. कॅल्शियम अमोनियम नाईट्रेट२५.००
५. युरिया४६.००
)स्फुरदयुक्त खते
१. सिंगल सुपर फॉस्फेट१६.००१२.००
२. ट्रिपल सुपर फॉस्फेट४८.००१-१.५
क)पालाशयुक्त खते
१. म्युरेट ऑफ पोटॅश६०.००
२. सल्फेट ऑफ पोटॅश४८.००
ड)संयुक्त खते
१. डाय अमोनियम फॉस्फेट१८४६
२. नायट्रो फॉस्फेट (सुफला)२०२०
३. नायट्रो फॉस्फेट (उज्वला)१५१५१५

उपरोक्त तक्त्यामध्ये दिलेल्या अन्नांशाच्या प्रमाणाच्या आधारे नत्र, स्फुरद अथवा पालाशयुक्त खताच्या द्यावयाच्या मात्रा काढता येतात (तक्ता क्र. ४).

तक्ता क्र. ४ : खताच्या मात्रा काढणे

अन्नद्रव्यांचे नांवहव्या असलेल्या खताद्वारे पुरवठ्याची मात्रागुणकांक
नत्रयुरिया२.१७
नत्रअमोनियम सल्फेट५.००
नत्रअमोनियम क्लोराईड४.००
नत्रअमोनियम सल्फेट नायट्रेट३.८४
स्फुरदसिंगल सुपर फॉस्फेट६.२५
पालाशम्युरेट ऑफ पोटॅश१.६७

उदा. समजा आपणास १०० किलो नत्र पिकाला द्यावयाचा आहे. युरिया आणि अमोनियम सल्फेटच्या स्वरुपात म्हणजे १०० x २.१७ गुणकांक = २१७ कि.ग्रॅ. युरिया किंवा १०० x  ५ = ५०० कि.ग्रॅ. अमोनियम सल्फेट.

तक्ता क्र. ५ : सूक्ष्म अन्नद्रव्य पुरविणारी खते आणि त्यांचे प्रमाण

खताचे नांवअन्न्द्रव्याचे प्रमाण (%)इतर अन्न्द्रव्यांचे प्रमाण (%)
जस्त सल्फेट२२.५ (जस्त)१५
फेरस सल्फेट१९.० (लोह)१९
मँगनीज सल्फेट३०.५ (मँगनीज)१७
तांबे सल्फेट२४.० (तांबे)१३
अमोनियम मॉलिब्डेट५२.० (मोलाब्द)
बोरॅक्स (सोडियम टेट्राबोरॅट)१०.५ (बोरॉन)
जिप्सम२०

शिफारशी

1.  जमिनीत उपलब्ध जस्त कमी असल्यास १७.७५ कि.ग्रॅ. जस्त सल्फेट प्रति हेक्टरी ज्वारी – गहू अथवा साळ – हरभरा या पीक चक्रामध्ये जमिनीतून द्यावे.

2.  जमिनीत जलद्राव्य बोरॉनचे प्रमाण कमी असल्यास ५ कि.ग्रॅ. प्रति हेक्टर बोरॅक्स कापसाच्या पिकास जमिनीतून द्यावे.

3.  चुनखडीयुक्त जमिनीत मसुरी रॉक फॉस्फेट आणि जीवाणूखत याचा वार साळ, भुईमूग या पीक चक्रामध्ये जमिनीतून करावा.

4.  भुईमूग पिकास हेक्टरी ५० किलोग्रॅम स्फुरदाची मात्रा बोरॉनयुक्त सुपर फॉस्फेट किंवा ५ किलो बोरॅक्स अधिक सिंगल सुपर फॉस्फेटद्वारे जमिनीतून दिल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते.

5.  सूर्यफुल या पिकास हेक्टरी ७५ कि.ग्रॅ. स्फुरदाची मात्रा बोरान युक्त सुपर फॉस्फेट किंवा ७.५ कि.ग्रॅ. बोरॅक्स अधिक ७५ कि.ग्रॅ. स्फुरदाची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेटद्वारे (उत्पादनात वाढ होण्यासाठी) जमिनीतून द्यावी.

6.  सर्वसाधारणपणे द्विदल पिके विशेषत: सोयबीन हे पीक सरी आणि वरंबा पद्धतीने घेतल्यास आणि स्फुरदाची जास्त मात्रा १२० कि.ग्रॅ. स्फुरद प्रति हेक्टरी तसेच शिफारशीप्रमाणे नत्राची मात्रा दिल्यास रबी ज्वारीमध्ये नत्र आणि स्फुरदाची कार्यक्षम वापर होऊन ओलावा टिकून राहण्यास मदत होते आणि उत्पादनात भरीव वाढ होते.

एकात्मिक पीक पोषण पध्‍दती

रासायनिक खताबरोबर सेंद्रिय खते, हिरवळीची खते, जिवाणू खते आणि सेंद्रिय द्रव्ये यांचा योग्य प्रमाणात पूरक खते म्हणून वापर करण्याच्या पद्धतीस एकात्मिक पीक पोषण पद्धती असे म्हणतात.

      या पद्धतीत रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक खतांचा समतोल साधला जातो. तसेच पिकांच्या फेरपालटीत द्विदल पिकांचा समावेश करुन जमिनीची सुपिकता टिकविली जाते. या पद्धतीत पिकांच्या भरघोस उत्पादनाबरोबरच अन्नधान्य आणि जमिनीचा दर्जा सुधारला जातो. महागड्या रासायनिक खतांची बचत करुन जमिनीची उत्पादकता वर्षानुवर्षे सुधारली जाते. या पद्धतीमध्ये सर्वसाधारणपणे अन्नद्रव्याच्या एकूण गरजेपैकी अर्धी मात्रा रासायनिक खतामधून दिली जाते आणि उरलेली अर्धी मात्रा सेंद्रिय खतांमधून भागविली जाते. दर तीन वर्षातून एकदा हिरवळीच्या खतांची पिके घेऊन जमिनीत गाडण्याची शिफारस केली आहे. पिकांचे सर्व अवशेष जसे ऊसाचे पाचट, ज्वारीची धसकटे, गहू व साळीचे बुडखे, सुर्यफुलाचे खोड आणि भुसा डाळवर्गीय पिकांचे सर्व अवशेष, इत्यादी जमिनीत गाडून सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढविले जाते. या बरोबरच जिवाणू खते व गांडूळ खतांचा वापर करणे गरजेचे असते.

रासायनिक खतांची निवड करतांना खालील बाबींचा आवश्य विचार करावा.

1.  दीर्घकालीन पिकांसाठी संयुक्त खतांचा वापर करावा (नायट्रो फॉस्फेट १५:१५:१५) (अमोनियम फॉस्फेट २८:२८:०)

2.  स्फुरदाची उपलब्धता सुकर होण्यासाठी पूर्णपणे विद्राव्यशील खतांची निवड करावी. उदा. सिंगल सुपर फॉस्फेट, डाय अमोनियम फॉस्फेट

3.  डाळवर्गीय व तेलबियांसाठी गंधकयुक्त खतांचा समावेश करवा. उदा. अमोनियम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट, अमोनियम फॉस्फेट, सल्फेट

4.  स्फुरदाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्फुरद विद्राव्य करणारे जिवाणू (पि.एस.बी.) खतांचा वापर करावा.

5.  नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवरणयुक्त युरियाचा वापर करावा. (निमकोटेड युरिया, सल्फर कोटेड युरिया).

6.  हिरवळीची खते म्हणून गिरीपुष्पाचा किंवा सुबाभळीच्या कोवळ्या फांद्या वापराव्यात.

7.  साखर कारखान्यातील ऊसाची मळी, जिवाणू खत (बायो अर्थ कंपोस्ट) चा वापर करावा.

रासायनिक खते कशी द्यावीत

1.  साधरणत: स्फुरदयुक्त आणि पालाशयुक्त खते एकाच हफ्त्यात पेरणीच्या वेळी आणि बियाण्यापासून ५ सें.मी. खोल द्यावीत.

2.  नत्रयुक्त खताची पूर्ण मात्रा एकाच हफ्त्यात न देता पिकाच अवस्था लक्षात घेऊन २ अथवा ३ हफ्त्यात द्यावेत.

3.  चुनखडी असलेल्या जमिनीत अमोनियम सल्फेट किंवा युरिया जमिनीच्या पृष्ठभागावर दिल्यास बराच नत्र उडून जातो. म्हणून ही खते जमिनीत मिसळून द्यावीत.

4.  नत्र वाहून जाऊ नये म्हणून पाण्याच्या पातळीवर नियंत्रण ठेवावे. खते शक्यतो पेरणीच्या वेळी द्यावीत व मातीने झाकावीत.

5.  पिकाच्या कालावधीप्रमाणे खताच्या मात्रा विभागून देणे फायदेशीर ठरते.

हे पण वाचा –

Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj